कृषीदिंडीतून स्व. वसंतराव नाईकांना अभिवादन; पुसद ते गहुली मार्गावर हजारो वसंतप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त पुसद ते गहुली दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य कृषीदिंडी मंगळवारी उत्साहात पार पडली. स्व. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, वसंतराव नाईक जयंती उत्सव समिती आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात हजारो वसंतप्रेमी, शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जयंतीनिमित्त सकाळी वसंतराव नाईक चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. माजी प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मोहिनी नाईक, बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, दीपक आसेगावकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, उपविभागीय अधिकारी आशिष बीजवाल, मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांच्यासह विविध मान्यवर, नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, अभ्यासीकेचे व शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.
कृषी दिनाचे औचित्य साधून नाईक चौकातून गहुली स्मृतिस्थळाच्या दिशेने कृषीदिंडीला प्रारंभ झाला. कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक ट्रॅक्टर पुढे ठेवून दिंडी मार्गस्थ झाली. मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी दुचाकींवरून सहभाग नोंदविला. नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी स्वतः दुचाकी चालवत दिंडीत सहभाग घेतला. वरुड, ज्योतीनगर, घाटोडी, बजरंगनगर आणि चोंढी येथे ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
गहुली येथे पोहोचल्यानंतर स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. समाधी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर ह.भ.प. पंकज पाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन संपन्न झाले.
यावेळी नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी कृषीला उद्योगाची जोड देणे, जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्येक गावात व प्रत्येक शेतात प्रभावीपणे राबविणे, हीच स्व. वसंतराव नाईक यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. दीपक आसेगावकर, संदेश चव्हाण आणि डॉ. टी. सी. राठोड यांनीही वसंतराव नाईक यांच्या कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र जाधव यांनी मानले. तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास पुसदसह महागाव व परिसरातील हजारो नाईकप्रेमींनी उपस्थिती लावली.



