महाराष्ट्रात सत्ताधारी मंत्राचे आमदाराचे चालले काय?(शेतकऱ्यांची कर्जमाफी साठी मागणी)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
सध्याच्या परिस्थितीवर आधारित लिखाण:- त्या रम्मी मध्ये पैसे जिंकून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ‘त्या’ काकांनी मार्गक्रमण केलं होतं. अधिवेशनाचं काय, ते चालत राहतं. असंही तिथं हल्ली हुल्लडबाजी, मारामारी अन् निरर्थक हास्यकल्लोळ सुरू असतो. त्या तशा नीरस वातावरणात जर रम्मी सारख्या प्रेरणादायी खेळात सक्रिय सहभाग नोंदवला तर बिघडलं कुठं?
कोणी आईच्या नावानं बार चालवून अर्थव्यवस्थेला हातभार लावतोय तर कोणी निकृष्ट जेवण दिलं म्हणून कॅन्टीन चालकाला विनाशुल्क कुस्तीचे आणि बॉक्सिंगचे धडे देतोय. कोणी सामाजिक कार्यासाठी बेड रूममध्ये पैशांचे बंडल जमा करून जपून ठेवत आहे, तर कोणी रोज प्रक्षोभक भाष्य करून लोकांचा संयम आणि इतिहासाचं ज्ञान वृद्धिंगत करत आहे. कोणी विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारीचे प्रात्यक्षिक प्रदर्शित करत आहे, तर कोणी तरी जबरदस्तीने शाळकरी मुलांना हिंदी सक्ती करत या विषयावर राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करत आहे. ही सगळी मोहीम केवळ आणि केवळ व्यापक जनहिताच्या संकल्पनेने प्रेरित आहे, हे तुम्हा लोकांना अजिबात समजणार नाही.
पण जाऊ द्या! भल्याची दुनिया राहिली नाही. व्हिडिओ काढून वायरल करतात हे कृतघ्न लोकं! या सर्व शुल्लक घटनांमुळे या सर्वांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं, उचित नाही.
आता पुढच्या वेळी, सभागृहात सर्वात शेवटच्या बाकड्यावर बसून खेळा, म्हणजे कोणालाच व्हिडिओ काढता येणार नाही
आणि हो, महाराष्ट्र आता थांबणार नाही!
~ संजय नागरगोजे



