यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई उप अभियंत्याला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले !

शेख मुजाहिद ससंपादक मो 7798306192
आर्णी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), यवतमाळ कार्यालयाने आज एक मोठी कारवाई करत, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, आर्णी येथील वर्ग १ दर्जाचे उप अभियंता संतोष भगवानराव क्षिरसागर (वय ५३) यांना १०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
ला.प्र.वि. यवतमाळचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि अर्जुन घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, चालू वर्षातील ही त्यांची पाचवी यशस्वी सापळा कारवाई आहे. नेमके काय घडले? यातील तक्रारदार हे एका गावाचे सरपंच आहेत. त्यांनी त्यांच्या गावात स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल काढण्यासाठी आणि काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी तक्रारदारांनी उप अभियंता संतोष क्षिरसागर यांची भेट घेतली. त्यावेळी क्षिरसागर यांनी मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या कामाच्या २ टक्के, म्हणजेच २०,००० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी १४/०७/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली.
१५/०७/२०२५ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली, असता क्षिरसागर यांनी २ टवके लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ टक्का म्हणजेच १०,००० रुपये स्वीकारण्याची सहमती दर्शवली. सापळा कारवाई आणि अटक याच अनुषंगाने आज, १६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते ६:३० या वेळेत सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. या कारवाईदरम्यान, आरोपी उप अभियंता संतोष क्षिरसागर यांनी त्यांच्या आर्णी येथील शासकीय कार्यालयात त्यांच्या खाजगी चालक सागर शंकरराव भारती (वय २७) याच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच, क्षिरसागर यांना खाजगी चालकासह रंगेहात ताब्यात घेण्यात आले. पुढील कार्यवाही याप्रकरणी आर्णी पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोज ओरके (ला.प्र.वि. यवतमाळ) करत आहेत. सदरची कार्यवाही मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि अतुल मते, अब्दुल वसीम, पोना सचिन भोयर, राकेश सावसाकडे, भागवत पाटील व चालक अतुल नागमोते (सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ) यांनी यशस्वीपणे पार पाडली.



