उभ्या ट्रकला आयशरची धडक; ट्रक मालक ठार

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड, ता. १५ : नागपूरहून कोल्हापूरकडे मॅगनिज पावडर घेऊन जात असताना नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिल्ली- सुकळी दरम्यान ट्रकचा टायर बदलण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून टायर बदलत असताना मागून येणाऱ्या आयशर वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात ट्रक मालक चेंगरून जागीच ठार झाला. तर चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. १५) पहाटे ६:३० दरम्यान घडली.
राहुल कोंडीबा फड (वय ३३, रा. वाघधरा, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे मृत ट्रक मालकाचे नाव आहे. कंपनीसाठी उपयोगी मॅगनिज पावडरने भरलेला ट्रक घेऊन ते नागपूरहून कोल्हापूर कडे निघाले होते. दरम्यान ते चिल्ली ते सुकळीदरम्यान महामार्गाच्या एका बाजूला ट्रक उभा करून टायर बदलत असताना पाठीमागून येणाऱ्या तांदळाने भरलेल्या आयशर ट्रकने यांच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकमालक राहुल फड हा चेंगरून जागीच ठार झाला. तर वाहनचालक लक्ष्मण रानबा वाघमारे (रा. तीर्थ धानोरा, ता. अहमदपूर, जि. लातूर) हा किरकोळ जखमी झाला. घटना घडल्यानंतर आयशरचा चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश मुंडे व बीट जमादार भवरे करीत आहेत. अपघात घडविणारे आयशर वाहन हे तांदूळ घेऊन वाशीमहून नांदेडकडे जात होते. या तांदळाचे आम्ही नमुने घेतले आहेत. पुढील चौकशी सुरु आहे, अशी माहती उमरखेडचे पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल महाजन यांनी दिली.



