**“गाडी उडवून ठार मारू!” — महागावमध्ये कायद्यालाच थेट आव्हान अॅडव्होकेटच्या हत्येचा कट उघड; फोनवरून जीवघेण्या धमक्या**

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी गंभीर व धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तरुण वकील अॅडव्होकेट अमजदखान अयुबखान पठाण (वय ३५) यांनी आपली हत्या करण्यासाठी पूर्वनियोजित कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप करत महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, वसीफ पठाण व शेख राजीक या व्यक्तींनी संगनमत करून अॅडव्होकेट अमजदखान यांच्या दैनंदिन हालचाली, प्रवासाचे वेळापत्रक व वाहनाबाबत माहिती मिळवली. या कटाचा भाग म्हणून संबंधित व्यक्तींनी अॅडव्होकेट यांच्या नियमित ड्रायव्हरला मोबाईल फोनवरून वारंवार संपर्क साधत थेट जीवघेण्या धमक्या दिल्याचा आरोप आहे.
“आज त्या अॅडव्होकेटच्या गाडीत बसू नकोस, आम्ही त्याला इथेच उडवून संपवणार आहोत,”
अशा स्वरूपाची दहशत निर्माण करणारी भाषा वापरण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, हे कॉल्स कोणत्याही क्षणिक वादातून नव्हे तर नियोजित कटाचा भाग असल्याचे तक्रारीतून स्पष्ट होते. तक्रारीसोबत संबंधित मोबाईल क्रमांक, कॉलची वेळ, तसेच प्रत्यक्ष साक्षीदारांची माहिती देण्यात आली आहे. या धमक्यांमुळे ड्रायव्हर व इतर साक्षीदार प्रचंड घाबरले असून, त्यांनी तात्काळ अॅडव्होकेट अमजदखान यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यामुळे संभाव्य गंभीर घटना टळली असावी, अशी चर्चा आहे.
अॅडव्होकेट अमजदखान यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, संबंधित व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असून त्यांच्या जीवाला तात्काळ व गंभीर धोका आहे. हत्या कट, जीवघेणी धमकी व अन्य गंभीर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची त्यांनी मागणी केली आहे. हा प्रकार केवळ वैयक्तिक सुरक्षेचा नसून, कायदा व्यवसायालाच दिलेले खुले आव्हान असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
या घटनेनंतर महागाव तालुक्यात भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“जर कायद्याची बाजू मांडणारा वकीलही सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कितपत आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती ठोस व तातडीची कारवाई करते, आरोपींवर कठोर पावले उचलते की एखादी अनुचित घटना घडल्यावरच हालचाल होते, याकडे संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ही तक्रार केवळ एक गुन्हा नसून, प्रशासनासाठी इशारा आणि निर्णायक क्षण मानली जात आहे.



