६ महिन्यांचा वनवास संपला! नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब यांच्या धडक पाठपुराव्यामुळे हिमायतनगरमध्ये ४७ लाभार्थ्यांच्या खात्यात ४७ लाख जमा; PMAY 2.0 च्या थकीत अनुदानाला अखेर मुहूर्त!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY 2.0) हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हिमायतनगर शहरातील गोरगरीब लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे अडकलेला अनुदानाचा हप्ता अखेर वितरीत करण्यात आला आहे. नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबुब यांनी शासकीय पातळीवर केलेल्या धडक आणि अथक पाठपुराव्याला मोठे यश आले असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा करण्यात आला आहे.
९७ पैकी ४७ कुटुंबांचे स्वप्न साकार; कामाला मिळणार गती!
हिमायतनगर शहरासाठी PMAY 2.0 अंतर्गत एकूण ९७ घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी ज्या ४७ लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात बांधकामास सुरुवात केली होती, त्यांचे काम केवळ निधीअभावी रखडले होते. नगराध्यक्ष शेख रफीक यांनी प्रशासनाकडे सतत तगादा लावून हा थकीत निधी मंजूर करून आणला. आज शहरातील ४७ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी १,००,००० रुपये (१ लाख) याप्रमाणे एकूण ४७,००,००० रुपये (४७ लाख रुपये) वर्ग करण्यात आले आहेत.
उर्वरित ५० लाभार्थ्यांनाही लवकरच दिलासा मिळणार
अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा झाल्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गोरगरीब लाभार्थ्यांनी नगराध्यक्ष शेख रफीक यांचे मनापासून आभार मानले आहेत. नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित ५० लाभार्थ्यांच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून त्यांचाही निधी लवकरात लवकर वर्ग केला जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



