महागाव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मुख्य व्यापारी मार्ग सात दिवसांपासून बंद

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील बाजारपेठ, किराणा दुकानांची लाईन, सोनार लाईन तसेच पंचायत समिती कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील नाली साफसफाईच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतुकीची समस्या गेल्या सात दिवसांपासून कायम असल्याने महागाव नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिक व व्यापाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नालीच्या कामासाठी मुख्य रस्ता खोदण्यात आला असून, अद्याप तो पूर्णपणे पूर्ववत करण्यात आलेला नाही. रस्त्यावर केवळ दोन पाईप टाकण्यात आल्याने व्यापारी लाईनमधील रहदारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे व्यापारी, ग्राहक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या समस्येबाबत व्यापारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला तसेच अध्यक्षांना वेळोवेळी दूरध्वनीद्वारे माहिती देऊन रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, सात दिवस उलटूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्य बाजारपेठेतील रहदारीचा मार्ग अशा प्रकारे दीर्घकाळ बंद राहणे ही गंभीर बाब असून, संबंधित काम तातडीने पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नगरपंचायत प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहिपर्यंत प्राप्त होऊ शकली नाही.
मुख्य व्यापारी मार्ग लवकरात लवकर पूर्ववत न केल्यास नागरिक व व्यापाऱ्यांकडून पुढील काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



