इंग्रजी शाळेत ‘फी’च्या नावाखाली लुटमार | पालकांना जबरदस्त आर्थिक फटका! : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
विदर्भ कल्याण / महागाव शैक्षणिक सत्र २०२५-२६ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असतानाच महागाव तालुक्यातील नामवंत खासगी इंग्रजी शाळांनी मनमानी शुल्क आकारण्याचे सत्र सुरू केले आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांच्या देणग्या उकळल्या जात असून, शिक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या या आर्थिक शोषणामुळे पालक त्रस्त झाले आहेत.
राज्य शासन शैक्षणिक सवलती देत असतानाही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे मौन यामुळे या शाळांच्या मनमानीला चाप बसलेला नाही. शाळांचे चालक बहुतेक राजकीयदृष्ट्या बळकट असल्याने कोणीही त्यांच्या विरोधात आवाज उठवत नाही. परिणामी, ‘फी’च्या नावाखाली सुरू असलेल्या या गोरखधंद्याचे सत्र दिवसेंदिवस
बळावत आहे.
पालकांच्या तक्रारीकडे कुणाचेही लक्ष नाही शाळेत प्रवेश घेण्यासाठी गर्दी वाढल्याने त्याचा गैरफायदा घेत शाळा “शैक्षणिक सुधारणा फंड”, “सुविधा शुल्क” अशा विविध नावाने हजारो रुपये मागत आहेत. नियमबाह्य ही रक्कम पूर्णतः बेकायदेशीर असूनही, शिक्षण विभाग गप्प आहे. काही पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, “शिकवायचंय म्हणून जास्तीचे पैसे दिले, कारण तक्रार केल्यास नंतर मुलांवर अन्याय होईल याची भीती वाटते.”
तालुक्यातील एकाही सामाजिक
संघटनेने किंवा राजकीय पक्षाने या लुटीविरोधात आवाज उठवलेला नाही. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अनेक पालक म्हणतात, “पाल्यांच्या भवितव्याचा विचार करून आम्ही गप्प बसतो, पण ही लूट कुठवर सहन करायची?”
शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन मनमानी शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक भान असलेल्या नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा पुढील काळात याविरोधात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.