सेवा सुरू असतानाच ग्रॅज्युटी उचलून घर खरेदीचा आरोप

बाबासाहेब नाईक कापूस सूतगिरणीतील कार्यकारी संचालकांवर कारवाईची मागणी
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्यादा, पिंपळगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील सूतगिरणीच्या कार्यकारी संचालकांनी सेवा समाप्ती न होता देखील सेवेतील उत्पादन ग्रॅज्युटी उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित ग्रॅज्युटीची रक्कम वापरून त्यांनी दिनांक 10 जून 2022 रोजी पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट, 1972 चे उल्लंघन व भंग झाल्याचा आरोप असून, संबंधित कार्यकारी संचालकांवर फौजदारी तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पंजाबराव रामराव देशमुख यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी अधिकृत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार्य कामगार अधिकारी, यवतमाळ यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाहीबाबत कळवले होते. मात्र, सदर पत्रव्यवहारानंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
कारवाई न झाल्यामुळे तक्रारदार पंजाबराव रामराव देशमुख यांनी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी स्मरणपत्र सादर करून तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागले आहे.
—



