महागाव तहसीलमधून जप्त ट्रॅक्टर पळविला माती तस्करांची धाडसी कृती; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश*

महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात गौण खनिज माती तस्करीविरोधात कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर थेट तहसील कार्यालयाच्या आवारातूनच माफियांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोषींविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, उमरखेड यांनी 17 डिसेंबर 2025 रोजी दिले आहेत.
मंगळवारी सवना येथे गौण खनिज मातीचे अवैध उत्खनन व बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला होता. संबंधित वाहन पुढील कारवाईसाठी महागाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास चार जणांनी संगनमत करून हा ट्रॅक्टर बेकायदेशीररित्या तहसील कार्यालयातून पळवून नेल्याचे समोर आले आहे.
जप्त केलेले शासकीय ताब्यातील वाहन पळून गेल्याने महसूल विभागाने महागाव पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही महागाव तहसील कार्यालयातून अवैध उत्खननप्रकरणी जप्त केलेले ट्रक व ट्रॅक्टर पळवून नेण्याच्या घटना घडल्या असून, त्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी पोलिसांनी डोंगरगाव येथून ट्रक जप्त करून कारवाई केली होती. अशीच घटना पुन्हा घडल्याने महसूल व पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांच्या आदेशानुसार संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी महागाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार सादर केली आहे. या तक्रारीत ट्रॅक्टर मालक दिलीप सदाशिव येरवड, योगेश सदाशिव येरवड, अनिकेत येरवड व पिंटू कटारे (सर्व रा. सवना) यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व शासनाच्या ताब्यातील वाहन पळवून नेणे, अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवानंद कायंदे करीत आहेत.



