हिमायतनगर येथे ‘संस्कृत सभागृह’ उभारणीसाठी प्रशासनाला निवेदन; सय्यद अखिल यांचा पुढाकार

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): हिमायतनगर शहरामध्ये संस्कृत भाषा, संस्कृती, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र ‘संस्कृत सभागृह’ मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी सय्यद अखिल यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात नागेश पाटील आष्टेकर, आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून नगर पंचायतीच्या आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्यांकडे नियोजनाचे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या व मुद्दे:
स्वतंत्र सभागृहाची निर्मिती: व्याख्याने, शिबिरे, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हिमायतनगर येथे सर्वसोयींयुक्त सभागृह उभारणे.
शैक्षणिक व सांस्कृतिक विकास: परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना अभ्यासात्मक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देणे.
थोर गायकांच्या स्मृती जतन करणे: देशातील प्रसिद्ध व दिग्गज गायकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा संगीताचा अमूल्य वारसा जिवंत ठेवण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणे.
स्थानिक कलावंतांना पाठबळ: तालुक्यातील गायक आणि कलावंतांच्या प्रलंबित समस्या सोडवून त्यांना योग्य व्यासपीठ व प्रशासकीय सहकार्य मिळवून देणे.
नगर पंचायत प्रशासनाने या रास्त मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन पत्र नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करते वेळी शेख फेरोज खुरेशी सीवी उपस्थित होते.



