शहर

प्रशासकीय कार्यक्षमतेचा बहुमान: हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर ‘जिल्हा आदर्श तहसीलदार’ पुरस्काराने सन्मानित


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): महसूल दिनाचे औचित्य साधून हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. ६ ऑगस्ट रोजी आयोजित एका भव्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या शुभहस्ते त्यांना ‘जिल्हा आदर्श तहसीलदार पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले.
​तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून हिमायतनगर तालुक्यातील महसूल कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर दिला. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, तसेच विविध सामाजिक घटकांच्या अडचणी थेट जाणून घेत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेगाने केला. दाखले, फेरफार नोंदी, जमिनीचे प्रश्न आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवून लोकाभिमुख काम केल्याबद्दल जिल्हास्तरावर त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक झाले.
​पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना पल्लवी टेमकर म्हणाल्या, “हा गौरव केवळ माझा नसून हिमायतनगर तहसील कार्यालयातील संपूर्ण महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचे फलित आहे.”
​या उल्लेखनीय यशामुळे हिमायतनगर तालुकाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संपूर्ण महसूल विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button