Uncategorized

आठ वर्षांपूर्वीच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी नाही; काऊरवाडीतील रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील मौजा काऊरवाडी येथील सर्वे क्रमांक ४०/२ मधील वहिवाटीच्या रस्त्याबाबत सन २०१८ मध्ये तत्कालीन नायब तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा करण्यात आली असून, तहसीलदारांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विविध गावांतील रस्त्यांच्या तक्रारींवर तहसीलदार स्वतः पाहणी करून कारवाईचा सपाटा लावत असल्याचे दिसून येत आहे.

उपलब्ध अधिकृत पत्रानुसार, तत्कालीन नायब तहसीलदारांनी २ एप्रिल २०१८ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील संबंधित तरतुदींनुसार चौकशी करून वहिवाटीचा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता. मात्र, आदेशानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.

यानंतर अर्जदार राजेंद्र दत्तराव तायडे व इतर यांनी पुन्हा तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानुसार १९ जून २०२६ रोजी तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, काऊरवाडी यांना पत्र पाठवून पूर्वीच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित रस्ता खुला करावा तसेच कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

मात्र, तहसीलदारांच्या निर्देशानंतरही संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अपेक्षित कार्यवाही केली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. त्यामुळे आठ वर्षांनंतरही आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

यासंदर्भात तहसीलदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, “तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोणत्याही शेतकऱ्याचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहू दिला जाणार नाही.”

दरम्यान, महसूल विभागाच्या पुढील कार्यवाहीकडे तसेच संबंधित शेतकऱ्यांना वहिवाटीचा रस्ता प्रत्यक्षात कधी उपलब्ध होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button