मराठवाडा प्रगतीच्या झगमगाटात, विदर्भाकडील बाजू दुर्लक्षितच

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड, २६ जुलै विदर्भातील उमरखेड तालुक्यातील बिटरगाव जेवली ते सहसकुंड धबधबा या मार्गावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य उधळले असले तरी, येथील विकासकामांच्या अभावामुळे पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर बाजूकडील भागावर प्रशासकीय प्रयत्नांतून विकासकामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने पर्यटकांचा ओढा ‘त्या’ दिशेने वाढलेला स्पष्ट दिसतो.
विदर्भ बाजूवर फक्त ‘उदासी’च
सहस्रकुंड धबधब्याच्या उमारखेड तालुक्यातील विदर्भबाजूवर पर्यटकांची वर्दळ असूनही येथील रस्ते, पूल, संरचना आणि मूलभूत सोयी-सुविधा अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. जेवली ते सहसकुंड या मार्गावरील नाल्यावरचा ‘रपटा कम पुला’ खालून पाणी वाहण्यासाठी टाकण्यात आलेले पाईप जाम झाल्याने पावसाळ्यात पाणी थेट पुलावरून वाहू लागते. परिणामी, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, चारचाकी आणि दुचाकी चालक तसेच जनावरांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
पर्यटन क्षेत्राची संभाव्यता असूनही दुर्लक्ष
पर्यटन विकासाच्या दृष्टीने सहसकुंड हे एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. राज्य शासनाने यास पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली असून, माजी आमदार मदन येरावार यांच्या प्रयत्नांमुळे निधीही मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात विदर्भ बाजूने विकासकामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना निराशा आणि उदासवाणे दृश्य पाहावे लागते.
मराठवाडा बाजूने जलदगती विकास
नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर बाजूकडील विकासकामे रस्ते, दुभाजक, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा पूर्ण झाल्याने पर्यटकांचा ओढा नैसर्गिकपणे तिकडे वळला आहे. हाच धबधबा, हाच निसर्ग, पण दोन बाजूंमधील विकासाची तफावत पाहता प्रशासकीय नियोजनातील विषमता स्पष्टपणे जाणवते. ढाणकी (हरदडा फाटा) उमस्खेड रस्ता दयनीय
या परिसरातील आणखी एक मोठी समस्या म्हणजे ढाणकी, हरदडा फाट्यापासून उमरखेड हा रस्ता. सद्यस्थितीत हा मार्ग पूर्णपणे उखडलेला असून, पावसाळ्यात प्रवास अत्यंत धोकादायक बनतो. हा मार्ग केवळ पर्यटकांपुरता मर्यादित नसून, स्थानिकांचे दैनंदिन जीवन, शेतीसाठीची वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे.
प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी
पुलाखालील पाईपचा अडथळा त्वरित दूर करावा. विदर्भ बाजूकडील पर्यटन विकास योजना युद्धपातळीवर सुरू कराव्या. ढाणकी उमरखेड रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण तातडीने व्हावे. सहस्रकुंडच्या सौंदर्याचा खरा अनुभव उमरखेड बाजूकडूनच मिळतो, याचा विसर पडू नये, प्रशासनाने या बाजूची रखडलेली कामे तातडीने सुरू करून पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करावा, हीच नागरिक आणि पर्यटकांची मागणी आहे.



