अखेर १७ दिवसांनी अर्जुन जाधव हत्या प्रकरणात धक्कादायक आरोप; सासरे व साला संशयाच्या भोवऱ्यात

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील अर्जुन जाधव यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर १७ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या कुटुंबीयांनी सासरकडील नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्जुन जाधव यांची हत्या करण्यात आली असून या घटनेत त्यांच्या पत्नी व सासरकडील मंडळींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रार अर्जानुसार, अर्जुन जाधव हे मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचा विवाह पिंकी देवी (भारत सिंह जाधव यांची मुलगी) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरकडील मंडळींकडून अर्जुन जाधव यांना वारंवार त्रास व धमक्या दिल्या जात होत्या, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अर्जुन जाधव हे फुलसांगवी येथे वास्तव्यास होते. ६ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतदेहावर गळा दाबल्याचे प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या वेळी केवळ मर्ग नोंद करण्यात आली होती, असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
अर्जुन जाधव यांचे भाऊ टेकपाल सिंह जाधव यांच्या तक्रारीवरून अखेर १७ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अर्जुन जाधव यांचे सासरे भारत सिंह जाधव आणि साला रवी भारत सिंह जाधव यांनी मिळून हत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 19/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1), 3 (5), 351 (1)(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धनराज निळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) राठोड करीत असून आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



