संवेदनशील गावांमध्ये पोलीस पाटील नसल्यामुळे गुन्हेगार माजले; माहिती पोलिसांपर्यंत न पोहोचण्याची गंभीर बाब उघड

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस पाटील अनेक गावांत नियुक्त नसल्याने गुन्हेगारी माहिती पोलिसांपर्यंत वेळेवर पोहोचत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यात एकूण 51 पोलीस पाटील पदे मंजूर असताना फुलसांगी, करंजखेड, धनोडा तसेच इतर काही गावांत ही पदे काही महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांचे प्रमाण वाढण्यास सुरुंग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. संवेदनशील गावांमध्ये गुन्हेगारीची रेलचेल फुलसांगी हे गाव संवेदनशील मानले जाते. येथे अवैध रेती उत्खनन व वाहतूक मटका-जुगार,गांजाचे व्यवहार चोऱ्यांची मालिका यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे असल्याने पोलीस पाटीलची तत्काळ नियुक्ती अत्यंत गरजेची असल्याची मागणी जोर धरत आहे. गाव पातळीवर गुन्हेगारीची प्राथमिक माहिती पोलिसांना पोहोचवण्याचे काम पोलीस पाटील करतात. परंतु पद रिक्त असल्याने पोलिसांना अचूक व तातडीची माहिती मिळत नाही, त्यामुळे कारवाई उशिरा होत असल्याचे समोर आले आहे. पद रिक्त, प्रशासनाकडे दुर्लक्ष महागाव तालुक्यात 4 ते 5 गावांत पोलीस पाटील पदांचे प्रस्ताव प्रलंबित असून, मागील अनेक महिन्यांपासून नियुक्ती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. फुलसांगी ग्रामस्थांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्निल नाईक , विजय महाजन यांनी या बाबत तहसील प्रशासन आणि पोलीस विभागाला लेखीरीत्या निवेदन देऊन तातडीने पोलीस पाटील नेमावा अशी मागणी केली आहे. स्थानिकांची मागणी — ‘पोलीस पाटील नेमल्याशिवाय गाव सुरक्षित नाही’ गावातील नागरिकांनी स्पष्ट केले की, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी पोलीस पाटीलची उपस्थिती अत्यावश्यक आहे. अवैध धंदे वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असून प्रशासनाने तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.



