करंजखेडमध्ये सामाजिक सभागृहाच्या राखीव जागेचा गैरवापर? फेरफार रजिस्टरमध्ये संशयास्पद नोंद; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
करंजखेड (ता. महागाव) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत सामाजिक सभागृहासाठी राखीव ठेवलेल्या जागेचा विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने एका व्यक्तीच्या नावावर फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून, दोषींवर कठोर कारवाई आणि संपूर्ण चौकशीची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, 12 मार्च 2021 रोजी आयोजित समाजाच्या मासिक सभेत “नमुना 8” मधील रक्कम आणि जागा सामाजिक समूहाच्या नावेच ठेवण्याचा ठराव एकमताने पारित झाला होता. मात्र त्यानंतर कोणतीही सभा न घेता अथवा निर्णय नोंद न करता संबंधित राखीव जागा संशयास्पदरीत्या एका खासगी व्यक्तीच्या नावावर दाखल करण्यात आली.
ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की, सामाजिक सभागृहासाठी मंजूर असलेली सुमारे 1500 चौ.फुट जागा कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीगत मालकीवर वर्ग करता येत नाही, तरीही ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून फेफार रजिस्टरमध्ये चुकीची नोंद करून नियमांचे उल्लंघन केले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करत सांगितले आहे की, त्यांनी सभेचा ठराव न पाळता विनापरवानगी जागेची फेरफार नोंद केली. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नसून, ग्रामपंचायत कार्यालयानेही ग्रामस्थांना कोणतीही नोटीस न देता हा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची, तसेच समाजाच्या नावे असलेली जागा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आणि बोटांचे ठसे असून, ते गटविकास अधिकारी, पंचायत समिती महागाव यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.



