शहर

कौडगाव ग्रामपंचायतीत सचिवाचा उघड उघड भ्रष्टाचार सरपंचांच्या बनावट सह्या, ओटीपी घोटाळा;4 लाख 48 हजारांची थेट लूट फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कौडगाव ग्रामपंचायत ही सध्या सचिव गणेश देशमुख यांच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराचे केंद्र बनली आहे. सरपंचांच्या डुप्लिकेट सह्या करून विकास कामे, रस्ते कामे, मोटर पंप व इतर कामांच्या नावाखाली बोगस बिले काढून शासन निधीची उघड लूट करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पुढे आला आहे.
तक्रारीनुसार, प्रत्यक्षात नाली साफसफाई न करता परस्पर ओटीपी मिळवून तब्बल 48 हजार रुपये काढण्यात आले. हे पैसे कुणाच्या घशात गेले, हा प्रश्न उपस्थित होत असून ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांवर गंभीर संशय निर्माण झाला आहे.
या प्रकरणी कौडगावच्या सरपंच इंद्राबाई किसन पवार यांनी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी गटविकास अधिकारी, महागाव यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली असून ‘आपले सरकार’ पोर्टलवरही तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र, तक्रार होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारीत स्पष्ट नमूद आहे की, सचिव गणेश देशमुख यांनी सरपंचांच्या बनावट सह्या करून शासन निधीचा गैरवापर केला, ग्रामपंचायतीत मासिक सभा व ग्रामसभा न घेता लोकशाहीचा गळा घोटला, सदस्यांना अंधारात ठेवून नियमधाब्यावर बसवले.
या प्रकरणी दोषी सचिवावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची संपूर्ण रक्कम वसूल करावी, अन्यथा ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील, असा स्पष्ट इशाराही सरपंच इंद्राबाई पवार यांनी दिला आहे.
या प्रकारामुळे कौडगाव ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णतः संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, गटविकास अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा प्रशासन नेमकी केव्हा जागे होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button