पालिकांच्या मतदार याद्यांवरील आक्षेपासाठी ४ दिवसांची मुदतवाढ !( काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळेंच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल ; राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांकडून समाधान व्यक्त )

शेख मुजाहिद सह-संस्थापक
उमरखेड :राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या ८ आक्टोबरला प्रसिद्ध झाल्या. या याद्यांवर आक्षेप व हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर आयोगाने निश्चित केली होती. मात्र आक्षेप व हरकतीसाठी अवघ्या पाचच दिवसांचा कालावधी दिल्या गेल्याने, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्याकडे लेखी तक्रार ८ ऑक्टोबरला केली होती. त्यावर आयोगाच्या सचिवांनी दखल घेत १३ ऑक्टोबरला सुधारित आदेश जारी करून आक्षेपासाठी १७ ऑक्टोबरपर्यंतची म्हणजे चार दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख जाहीर केली. १३ ऑक्टोबरपर्यंत त्यावर आक्षेप, हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. मात्र, आयोगाच्या या कार्यक्रमामध्ये आक्षेपासाठी केवळ पाचच दिवसांचा कालावधी दिल्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी ८ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली. अल्पकालावधीत प्रत्येक प्रभागातील मतदार याद्यांचा बारकाईने अभ्यास करून त्रुटी शोधणे व हरकती तयार करणे व त्या हरकती, सूचना निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे अवघड ठरत असल्याचे नमूद केले होते. नागरिकांसह सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना आक्षेप दाखल करायला अत्यल्प वेळ मिळाल्याचे , साहेबराव कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले होते. पूर्वी आक्षेपांसाठी १५ ते ३० दिवसांचा कालावधी दिला जायचा. मात्र, पाचच दिवसांचा कालावधी मिळाल्याने निवडणूक विभागाचे सचिव सुरेश काकाणी यांच्याशी थेट कांबळे यांनी संवाद केला. दरम्यान, काकाणी यांनी काल १३ ऑक्टोबरला राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. सुधारित आदेशाने आक्षेपासाठी १७ आक्टोबर पर्यंत अतिरिक्त ४ दिवसांचा वेळ मिळाल्याने, यवतमाळ जिल्ह्यासह राज्यभर फायदा झाला. या मुदत वाढीमुळे मात्र सर्व राजकिय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन कांबळेचे आभार व्यक्त केले जात आहेत.



