शहर

महागाव ग्रामीण रुग्णालय रामभरोसे; पाणी, डॉक्टर, ड्रायव्हर नाहीत — रुग्णांचे हाल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष


महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्याच्या ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालय महागाव आज अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले असून आरोग्य यंत्रणेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी पुसद येथील जे. नाईक यांच्याकडेच पुसद, सवना व महागाव अशी तीन ठिकाणांची जबाबदारी असल्याने ते प्रत्यक्ष महागाव येथे क्वचितच उपस्थित राहत असल्याचे दिसून येते. परिणामी रुग्णालयातील दैनंदिन कारभार ठप्प झाल्याची स्थिती आहे.
महागाव ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेला काळे लिपिक हा गेल्या एक वर्षापासून येथे कार्यरत असून, यवतमाळ येथे कार्यरत असताना त्याच्यावर ४ ते ५ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेची चौकशी / रिकव्हरी प्रलंबित असतानाही त्याची बदली महागाव येथे करण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित लिपिक हप्त्यातून एखाद्या वेळेस हजेरी लावतो, मात्र सर्व सह्या करून शासनाचा पगार मात्र नियमित घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. निधी उपलब्ध असतानाही योग्य नियोजन न केल्यामुळे ४ ते ५ लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला. विशेष म्हणजे साडेतीनशे फूट खोल बोअर असतानाही कर्मचारी व रुग्णांना पाणी पुरवता आले नाही, यावरून रुग्णालयाची दयनीय अवस्था स्पष्ट होते.
याच रुग्णालयासाठी उपलब्ध असलेले १०२ क्रमांकाचे रुग्णवाहन केवळ नावापुरतेच आहे. या वाहनासाठी शासनमान्य ड्रायव्हरच उपलब्ध नसल्याने १०२ वर कॉल करूनही गाडी मिळत नाही. आजतागायत ड्रायव्हरची पोस्टच भरली नसल्याने १०२ सेवा फक्त कागदावरच सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
महागाव ग्रामीण रुग्णालयात डिलिव्हरी रुग्णांसाठी शासनाकडून पुरवण्यात येणारा जेवणाचा डबा आजपर्यंत एकदाही नियमित देण्यात आलेला नाही. आतापर्यंत शंभरहून अधिक प्रसूती झाल्या असताना एकाही रुग्णाला शासनाची जेवणाची सुविधा मिळाली नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक व अमानवीय आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी पूर्णतः दुर्लक्ष करीत असून आमदार किसन वानखेडे व खासदार नागेश पाटील यांची साधी भेटदेखील रुग्णालयाला झालेली नाही, ही महागाव तालुक्यासाठी मोठी शोकांतिका मानली जात आहे. सवना ग्रामीण रुग्णालयातही अशीच अवस्था असल्याचे समोर येत आहे.
या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महागाव येथील पत्रकाराने आंदोलन व उपोषण केले, मात्र आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याची दैनंदिन स्थिती कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध न होणे, हेही विशेष ठरत असून पत्रकारितेतील उदासीनता उघड करणारे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर,
संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून महागाव ग्रामीण रुग्णालय सक्षम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
“रुग्ण जगतो की मरतो, याची कोणालाही फिकीर उरलेली नाही का?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button