Uncategorized

महागाव तालुक्याच्या प्रवेशद्वारावरच पाणीटंचाई; प्रभात क्रमांक ११ मधील नागरिक पाण्यापासून वंचित


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्याची सुरुवात ज्या
ठिकाणापासून होते, तो परिसरच आज शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याची गंभीर व शोकांतिका परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभात क्रमांक ११ मध्ये आजही नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे महागाव नगरपंचायतीचा कार्यकाळ तब्बल नऊ वर्षांचा झाला, तरीही या भागात पाण्याची मूलभूत सोय होऊ शकलेली नाही. अखेर आज पाण्याची व्यवस्था करण्यासाठी संभाजी नरवाडे साहेब यांच्या हाताने बोरवेल चे नारळ फोडून पाण्याची व्यवस्था करावी लागली.
ग्रामपंचायत काळात संभाजीसाहेब नरवाडे यांनी प्रभात क्रमांक १२ मध्ये विशेष व्यवस्था करून वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करून दिला होता. त्यानंतर राजनकर सरपंच असताना नदीवरून पाईपलाईन टाकून सुमारे दीड कोटी रुपयांची पाणी फिल्टर योजना उभी करण्यात आली. मात्र दुर्दैवाने, या योजनेतून गावातील एकाही नागरिकाला प्रत्यक्ष पाणी मिळाले नाही. ही योजना भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकून आज धूळ खात पडली आहे.
नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतरही संबंधित पदाधिकाऱ्यांनी ही फिल्टर योजना आपल्या ताब्यात घेऊन कार्यान्वित करण्याची साधी इच्छाशक्ती दाखवली नाही. परिणामी आजही नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याचबरोबर, आमदार निधीतून नगरपंचायतीला मंजूर झालेले रस्त्यांचे काम बांधकाम विभागाकडे देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात डमी ठेकेदारामार्फत सुमारे दोन कोटी रुपयांचे निकृष्ट व बेकामी रस्ते बांधण्यात आले, असा गंभीर आरोप होत आहे. या कामाची गुणवत्ता अत्यंत खराब असून नागरिक व वार्डातील लोकांना हे सर्व स्पष्टपणे जाणवत आहे. तरीही या कामांची कोणतीही चौकशी आमदारांकडून झालेली नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.
बांधकाम विभागात डमी ठेकेदार कार्यरत असल्याचे आरोप असून संबंधित ठेकेदारांचे बिल तात्काळ थांबवून क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करूनच देयके अदा करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आज महागाव नगरपंचायत फक्त शोभेची वस्तू बनली असून नगरपंचायत बैठकींना सदस्य उपस्थित राहत नाहीत, कामांवर तक्रारी मांडत नाहीत, तर काही सदस्य मुद्दाम बैठकींना गैरहजर राहून स्वतःला अनुपस्थित दाखवतात, हे सर्व जनतेसमोर उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या काळात महागावच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करून प्रामाणिक, कार्यक्षम, सर्वपक्षीय समन्वय साधणारा व विकासकामांना प्राधान्य देणारा नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी निवडणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा महागाव नगरपंचायत केवळ नावापुरती उरेल, असा इशारा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button