कष्टा करुन देशाचे पावित्र्य जगभर राखणाऱ्या कामगारांच्या प्रश्नांचे काय ?

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन. आजवर कष्ट करून या देशाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवणाऱ्या कामगार बांधवाचे देश विकासातील योगदान कुणीही नाकारू शकत नाही. कष्ट करणारे हात आपल्याला नको असतात. कारणं ते हात रखरखीत असतात. उन्हातान्हात कामाने चेहरे कालंवडलेले असतात. असे असले तरी ते हात ते चेहरे कष्टाने पवित्र झालेली असतात. रंग बदलणाऱ्या,मुखवटे पांघरून वावरणाऱ्या लोकांना लोक आदर्श मानतात भ्रष्ट लोकांना आदर्श मानण्याची परंपरा अलिकडे जास्तच फोफावत आहे. परंतु या कष्टकरी कामगार वर्गाकडे या व्यवस्थेच नेहमीच दुर्लक्ष होत आलेलं आहे. मग कामगार विरोधी कायदे असो किंवा कामगारांसाठी असणाऱ्या फसव्या योजना असो. यातुन या शासकीय व्यवस्थेची कामगारांविषयीची आस्था दिसुन येते. सामाजिक व्यवस्थेकडून कामगार वर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन अजुन म्हणावा तसा बदलेला नाही. श्रमप्रतिष्ठा हे मुल्य शाळेपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. श्रमप्रतिष्ठा हे मुल्य आजही समाजामध्ये ही शिक्षण व्यवस्था रुजवु शकलेली नाही. कामाच्या दर्जानुसार लोकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा बदलत जातो. भांडवलदार वर्ग कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करतं आलेला आहे. शोषणनत्वाची भावना अजुनही भांडवलदार वर्गाची बदललेली नाही. कामगारांकडून अधिकाधिक कामे करुन घ्यायची कामगारांच्या जीवावरती मोठ व्हायच आणि त्यातुन मिळणाऱ्या नफ्यात मात्र कामगारांना सहभागी करून घ्यायचं नाही. ही दुटप्पी भुमिका येथील भांडवलदार वर्गाची राहिलेली आहे. कामगारांच्या शोषणाला कित्येक वर्षांचा इतिहास आहे. कामगार आणि भांडवलदार यांच्यातील संघर्ष आजघडीला देखील संपलेला नाही. कामगारावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे समुळ उच्चाटन होण्यासाठी कडक कायदे या देशात अस्तित्वात येवू शकलेले नाहीत. आपल्या देशामध्ये असंघटित कामगारांचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा आवाज या व्यवस्थेत दाबला जातो.
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवून चालणार नाही तर त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच कामगारांच्या प्रश्नावरील औषध आहे.
अण्णा भाऊ साठे म्हणतात पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन.
ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावरती तरलेली आहे. हा विचार त्यांनी या व्यवस्थे समोर मांडला. कामगारांवरील अन्याय अत्याचार दुर करण्यासाठी येथे दुसरा कोणी येवून लढणार नाही तर कामगारांनाच कामगारांचा आवाज व्हावा लागेल. आणि आपल्या सामाजिक समस्येसाठी लढा दिला पाहिजे. कामगार बांधवाचे प्रश्न सुटुन त्यांनाही सुखाचे दिवस प्राप्त होतील अशी या कामगार दिनी अपेक्षा करुया.
अविनाश मारोतराव चंद्रवंशी
मो.क्रं. ८२७५२६५३७४
टाकळी. ता.उमरखेड जि. यवतमाळ.



