Uncategorized

जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील ३२२ आक्षेप निकाली


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या तब्बल ३२२ आक्षेपांचा विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून निपटारा करण्यात आला आहे. प्रारूप मतदार यादी १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप व हरकती दाखल करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता.
अमरावती येथे झालेल्या सुनावणीनंतर बहुतांश आक्षेप मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. २७ जुलैपासून सुनावणीला सुरुवात झाली होती. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी मतदार यादीत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. सुधारित मतदार यादी १९ ऑगस्ट रोजी अंतिम करण्यात येणार आहे.
दरम्यान, महागाव तालुक्यातील शिरपूर ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रतिनिधीच्या मतदार यादीतील समावेशावर घेण्यात आलेला आक्षेप फेटाळण्यात आला. संस्थेचे संचालक अजय पौरहित यांनी याबाबत आक्षेप नोंदविला होता.
पत्तासंस्थेच्या मतदारावरही आक्षेप
जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे नाव पत्तासंस्थेच्या मतदार यादीत असल्याच्या प्रकरणातही आक्षेप घेण्यात आला होता. संबंधित कर्मचाऱ्याच्या नावावरून विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी झाली. कर्मचाऱ्याने संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून निवड होऊ शकत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर संबंधित नाव अंतिम मतदार यादीतून वगळण्याची विनंती मान्य करण्यात आली.
आता १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून, या यादीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय व सहकारी समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button