बावनकुळे यांच्यावरील वक्तव्याचा निषेध; जरांगे पाटलांवर कारवाईची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : ओबीसी नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी कथितरीत्या आक्षेपार्ह व अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या महागाव तालुका पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. जरांगे पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महागाव तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात, मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे तेली समाजाच्या भावना दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, शासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
कारवाई न झाल्यास तेली समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे महागाव तालुका अध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव पांडे आणि तालुका कार्यकारिणी अध्यक्ष आनंदराव पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनाही देण्यात आल्या आहेत.



