शहर

महागाव प्रभाग १७ मध्ये देशी दारू विक्रीबाबत गंभीर आरोप होलसेल विक्री, अल्पवयीनांना दारू पुरवठ्याची तक्रार; कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मध्ये असलेल्या देशी दारू दुकानाबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. संबंधित दुकानदार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून होलसेल स्वरूपात दारू विक्री करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पेट्याने अवैध विक्रीचा आरोप
प्रभागातील काही रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, देशी दारूच्या पेट्या उघडपणे अवैध दारू विक्रेत्यांना दिल्या जात आहेत. तसेच अठरा वर्षांखालील मुलांना देखील दारू विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील संदेश व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले; मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
संगनमताचा संशय?
दारूबंदी अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना फोन व संदेश करूनही कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वार्ड क्रमांक १ मधील नव्या दुकानावरही आरोप
याचप्रमाणे वार्ड क्रमांक १ मध्ये नुकतेच सुरू झालेल्या देशी दारू दुकानातूनही होलसेल व नियमबाह्य विक्री होत असल्याची तक्रार आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
धार्मिक परिसरात दुकान; भविष्यात अनुचित प्रकाराची भीती
प्रभाग १७ मधील देशी दारू दुकानाजवळ देवांच्या मूर्ती बनविण्याचे काम केले जाते. अशा संवेदनशील परिसरात दारू विक्री होत असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
स्थानिक नागरिकांनी संबंधित दारूबंदी विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी तातडीने छापेमारी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. अल्पवयीनांना दारू विक्री व होलसेल व्यवहार सिद्ध झाल्यास परवाना रद्द करण्याचीही मागणी होत आहे.
या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button