शहर

दावत नव्हे, जनतेचे प्रश्न सोडवा; उमरखेड–महागाव मतदारसंघात राजकीय हालचालींवर चर्चा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड–महागाव मतदारसंघात आगामी राजकीय घडामोडींना वेग आला असून संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राजकीय मेळाव्यांवरून मतदारसंघात चर्चा रंगू लागली आहे. अलीकडे झालेल्या एका राजकीय दावत कार्यक्रमात अनेक नगरसेवक, माजी व विद्यमान पदाधिकारी उपस्थित राहिल्याने राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या घडामोडींवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असून, मतदारसंघातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना अशा राजकीय मेळाव्यांवर भर देणे योग्य आहे का, असा सवाल विचारला जात आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई, कोरडी पडलेली नद्या व बंधारे, धरणांचा अपुरा उपयोग, खराब रस्ते, तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि विमा भरपाईचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
मतदारसंघातील अनेकांनी मत व्यक्त केले की, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे नेतृत्वच जनतेचा विश्वास जिंकते. केवळ राजकीय मेजवान्या, गाठीभेटी किंवा आर्थिक बळावर उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करून जनतेची मने जिंकता येत नाहीत.
राजकीय इच्छुकांनी विकासकामे, पाणीप्रश्न, शेतकरी नुकसानभरपाई, रोजगार व पायाभूत सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन संघर्ष करावा, अशी अपेक्षा मतदारसंघातील जनतेतून व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार आता अधिक जागरूक झाले असून केवळ दिखाऊ राजकारणापेक्षा कामगिरीला प्राधान्य देतील, अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button