बंदीभागातील शेकडो युवकांचा बहुजन मुक्ती पार्टीत प्रवेश इंजि. विद्वान केवटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला पक्षप्रवेश

ढानकी, स्वातंत्र्याला 80 वर्षे पूर्ण होऊनही उमरखेड तालुक्यातील बंदीभागातील अनेक गावं आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, शुद्ध पिण्याचे पाणी यांचा अभाव असून दळणवळणाची समस्या ही येथील सर्वात मोठी अडचण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर बंदीभागातील शेकडो युवकांनी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. इंजि. विद्वान केवटे यांच्या अभ्यासू, परखड आणि निर्भीड नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेशप्रसंगी कार्यकर्त्यांनी जुने राजकीय पक्षांबद्दल नाराजी व्यक्त केली. “आजपर्यंत बंदी भागाने काँग्रेस, भाजप अशा अनेक पक्षांना भरघोस मते देऊन सत्तेचा मुकुट घातला. परंतु निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची खैरात करणारे नेते, निवडून आल्यानंतर मात्र ढुंकूनही बघत नाहीत. त्यामुळे आमचा प्रचंड भ्रमनिरास झाला आहे” अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.
अशातच गेल्या अनेक महिन्यांपासून इंजि. विद्वानभाऊ केवटे यांनी पायाला भिंगरी बांधून बंदीभागाचा दौरा केला. तालुक्यातील प्रत्येक दुर्गम गावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि तेथील समस्या शासन दरबारी मांडल्या. त्यामुळे शासन-प्रशासनाने बंदीभागात आजवर किती काम केले याचे खरे चित्र उघड झाले.
“बंदीभागातील सर्व रस्ते झाले तर येथील नागरिकांची 50 टक्के जगण्याची लढाई जिंकली जाईल” असे प्रतिपादन केवटे यांनी यावेळी केले. रस्त्याअभावी दळणवळण ठप्प आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि आदिवासीबहुल भागाचा विकास खुंटला आहे. अनेक मुले-मुली अर्ध्यातच शिक्षण सोडण्यास मजबूर होत आहेत.
केवटे यांनी बंदीभागातील समस्यांना वाचा फोडून अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आकाश जाधव, समाधान पंडागळे, अनिल लहाने, सुनील भोने, अरविंद राठोड, सुनील वाठोरे, सूरज मोरे, खंडू पोटे, विकास झांबरे, हिरसिंग जाधव, मुजाहिदीखान, कृष्णा पाटील चंद्रवंशी, मारुती लांडगे, अक्षय सूर्य, सफदरभाई, इंदल राठोड, श्रीकांत उमरे, आकाश लांडगेवाड, विलास कांबळे, राहुल कांबळे, वैभव धुपे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीत प्रवेश केला.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा पदाधिकारी बीमोद मुधाणे आणि पुंडलिक तलवारे यांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे बंदीभागात बहुजन मुक्ती पार्टीला मोठे बळ मिळाले असून येत्या काळात प्रस्थापितांची राजकीय समीकरणे बिघडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



