Uncategorized

पुसद येथे तहसीलसमोर शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न पांदण रस्ता मोकळा करून न दिल्याने संताप; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
न्यायालयाचा आदेश असतानाही शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता मोकळा करून न दिल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी पुसद तहसील कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर काही व्यक्तींनी चंदन, सीताफळ तसेच आंब्याची झाडे लावून कायमस्वरूपी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे शक्य होत नाही. या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनी प्रशासन तसेच न्यायालयाकडे वारंवार दाद मागितली होती.
न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन प्रशासनाला रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
यापूर्वीही या प्रश्नासाठी प्रशासनाकडे तसेच न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, समस्या कायम राहिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यावेळी नथ्थुजी नारायण ढाले, यमुना नथ्थुजी ढाले, रंगराव मुरस्के, नथ्थुजी जामकर, कपिल जैन, अरविंद नामदेव गडदे, कल्पना प्रशांत गडदे यांच्यासह संबंधित शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, शहर ठाणेदार गजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सतर्कता दाखवत आत्मदहनाचा प्रयत्न रोखला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून पांदण रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button