उमरखेडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : ट्युशनला ये-जा करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा मागील 6 ते 7 महिन्यांपासून पाठलाग करून वारंवार बोलण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विवेक दिलीप तंत्रे (वय 23, रा. बेलमंडळ, ता. हदगाव, जि. नांदेड) हा विद्यार्थिनी ट्युशनला जात असताना तिचा सतत पाठलाग करीत होता. पीडितेची इच्छा नसताना वारंवार बोलण्याचा प्रयत्न करणे, मोबाईलवर मेसेज पाठवून “तू मला का बोलत नाहीस?” अशी विचारणा करणे तसेच परिवारास इजा करण्याच्या धमक्या देणे, अशा प्रकारे तो त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दि. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजताच्या दरम्यान आरोपीने पुन्हा पाठलाग करून “तू बोलली नाहीस तर परिवारास मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर पीडितेने 26 फेब्रुवारी रोजी उमरखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खिल्लारे करीत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरून आरोपींवर वेळीच कारवाई करता येईल.



