महागाव तालुक्यात अवैध मटका व जुगार अड्ड्यांविरोधात ग्रामस्थांचा संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसावंगी, कलगाव पोखरी, धनोडा, चिखली व मलकापूर या भागांमध्ये अवैध मटका व बावन पत्त्याचे जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या अवैध धंद्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्र येत महागाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन संबंधित अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. विशेषतः फुलसावंगी व कलगाव पोखरी येथे बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर लोक येत असून, उघडपणे जुगाराचे अड्डे चालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, हे अवैध प्रकार त्वरित बंद करण्यात आले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



