महागाव तालुक्यात ‘सुरक्षित मातृत्व’ फक्त बॅनरपुरते? ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे आरोग्य धोक्यात

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात ‘सुरक्षित मातृत्व – गरोदरपणात देऊ विश्वास’ ही संकल्पना प्रत्यक्षात न उतरता फक्त बॅनर व जाहिरातीतच मर्यादित राहिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना आरोग्य विभागाकडून वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन व सेवा मिळत नसल्यामुळे गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गरोदर महिलांची 16 आठवड्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक, नियमित वैद्यकीय तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लस, लोहवर्धक गोळ्यांचे सेवन, पुरेशी विश्रांती व सकस आहार आवश्यक आहे. मात्र, हे सर्व नियम कागदोपत्री व बॅनरवरच दिसत असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अभाव असल्याचे ग्रामीण महिलांचे म्हणणे आहे.
महागाव तालुक्यासाठी उप-ग्रामीण रुग्णालय पुसद येथे असल्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कुमकुवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना उपचारासाठी दूरवर जावे लागत असून, योग्य मार्गदर्शनाअभावी गर्भवती महिलांना विविध शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यात फुलसांगी, महागाव व वसवना येथे ग्रामीण रुग्णालये असली तरी कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि महागाव ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना मूलभूत गरजांसाठीही अडचणी निर्माण होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पिण्याच्या पाण्याअभावी रुग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘सुरक्षित मातृत्व’ योजना महागाव तालुक्यात पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबवावी, जेणेकरून ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना योग्य व वेळेवर मार्गदर्शन मिळेल, अशी मागणी जयंत चौधरी, अध्यक्ष – मेडिकल असोसिएशन महागाव यांनी यवतमाळ येथे आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात केली आहे.



