पोंहडुळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेत नियमबाह्य कारभार; सचिवावर निलंबनाची मागणी

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
पोंहडुळ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितमध्ये गंभीर स्वरूपाचा नियमबाह्य व बेकायदेशीर प्रकार उघडकीस आला असून, संस्थेचे सचिव अमित जाधव यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी पाठविण्यासाठी दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीपूर्वीच दहिसावळी शिवारात आठ संचालकांनी गुपचूप बैठक घेऊन, बोली लावून बँक प्रतिनिधीची निवड केल्याचा गंभीर आरोप सभासदांकडून करण्यात आला आहे.
या कथित बैठकीत साडेतीन लाख रुपयांच्या बोलीवर प्रतिनिधी ठरवण्यात आला, जो सध्या त्या संस्थेचा थकीत सभासद असल्याचेही समोर आले आहे. नियमांनुसार थकीत सभासदाला प्रतिनिधी बनवता येत नसतानाही, शेतात बसून बेकायदेशीर बैठक घेऊन प्रोसिडिंग लिहून त्यावर सह्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, संस्थेतील काही संचालक व सभासदांना अंधारात ठेवून हा प्रकार करण्यात आल्याने, सर्वसाधारण सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. सहकार कायदे व नियमांना पायदळी तुडवून सचिवाने नियमबाह्य प्रोसिडिंग लिहिल्याचा आरोप करत, अशा सचिवाला तात्काळ निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सभासदांच्या मते, जर अशा पद्धतीने बेकायदेशीर मार्गाने निवडलेले प्रतिनिधी बँकेवर गेले, तर संस्थेच्या हिताचे संरक्षण कोण करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. हा प्रकार म्हणजे संस्थेतील सर्व सभासदांचा विश्वासघात असून, याबाबत लेखी तक्रार करून कायदेशीर दाद घेणार असल्याची प्रतिक्रिया संतप्त सभासदांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिली आहे.



