शहर

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील एक कोटींच्या ठेवींचा मुद्दा; ऑडिटमध्ये गंभीर नोंदी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सन 2011-12 मध्ये संस्थेच्या हितासाठी ठेवण्यात आलेल्या एकूण एक कोटी रुपयांच्या ठेवींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यात दुकानदारांची 20 लाख रुपयांची अमानत ठेव आणि संस्थेची 80 लाख रुपयांची मुदत ठेव अशी रक्कम होती. या ठेवींवरील व्याजातून कर्मचाऱ्यांचे पगार भागवले जात होते.
मात्र सन 2017 ते 2023 या कालावधीत सभापती म्हणून कार्यरत असलेल्या दीपक आडे यांच्या कार्यकाळात संबंधित एक कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढून घेतल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे दुकानदारांची 20 लाख रुपयांची अमानत ठेवही खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे.
ठेवींची रक्कम कुठे खर्च?
मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी निवास इमारतीचा जिना, रस्ता, संडास-बाथरूम, कंपाऊंड वॉल, तीन शेड बांधकाम तसेच 16 महिन्यांचे पगार यासाठी ठेवींची रक्कम वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे तब्बल 10 महिन्यांचे पगार थकले असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय सीसीआय खरेदीमधून जमा असलेले सुमारे 23 लाख रुपये उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
ऑडिटमध्ये नोंद
सदर बाबींची नोंद अधिकृत ऑडिट अहवालात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून ऑडिटरने ठेवी काढणे व खर्चाबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.
व्यापारी व्यवहारातून मोठी उलाढाल
कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. तरीदेखील नफ्यात असलेली संस्था ठेवी खर्च करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे चित्र दिसत असल्याने शेतकरी सभासदांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन मंडळाकडे लक्ष
संस्था सध्या डबघाईस आल्याची चर्चा असून नव्याने स्थापन होणारे मंडळ या प्रकरणात कोणती भूमिका घेते, जबाबदारी निश्चित होते का, तसेच आर्थिक शिस्त कशी प्रस्थापित केली जाते याकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button