निमोनियाने चिमुकली सिझा फातेमा सय्यदचा मृत्यू
सय्यद मुदस्सीर यांच्या एक वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत; डोंगरगावच्या आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील डोंगरगाव येथे निमोनियामुळे अवघ्या एक वर्षाच्या सिझा फातेमा सय्यद या चिमुकलीचा २२ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ती पत्रकार सय्यद मुदस्सीर यांची मुलगी होती. काही दिवसांपूर्वी शेनंद येथे एका चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच डोंगरगावातील या घटनेने ग्रामीण भागातील बालआरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्दैवी घटनेने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिमुकलीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर गावातील आरोग्य सुविधा, स्वच्छता तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गावात डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्याची समस्या असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे नियमित स्वच्छता, फॉगिंग, औषध फवारणी तसेच आरोग्य तपासणी केली जाते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
डासांचा प्रादुर्भाव; फॉगिंग व फवारणीची मागणी
डोंगरगावमध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आजारांचा प्रसार रोखण्यासाठी साचलेल्या पाण्याचा निचरा, नियमित स्वच्छता, फॉगिंग आणि औषध फवारणी यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, चिमुकलीच्या मृत्यूचा थेट संबंध डासांचा प्रादुर्भाव किंवा गावातील अस्वच्छतेशी असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेची वस्तुनिष्ठ पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
डोंगरगावला आरोग्य उपकेंद्र कधी?
महागाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगरगावमध्ये कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्राथमिक तपासणी व उपचारांसाठी नागरिकांना इतर ठिकाणी जावे लागत असल्याने गावात स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
मृत्यूची वैद्यकीय चौकशी करून उपाययोजना करण्याची मागणी
चिमुकलीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सय्यद मुदस्सीर यांनी प्रशासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक वैद्यकीय तपासणी करावी, तसेच ग्रामीण भागात प्रभावी प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
डोंगरगावमध्ये तातडीने स्वच्छता मोहीम, फॉगिंग, औषध फवारणी आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे. तसेच गावासाठी कायमस्वरूपी आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
—
चौकट : चिमुकलीच्या मृत्यूने अनेक प्रश्न ऐरणीवर
सिझा फातेमा सय्यद या एक वर्षाच्या चिमुकलीचा निमोनियामुळे झालेला मृत्यू ही डोंगरगावसाठी अत्यंत वेदनादायी घटना ठरली आहे. शेनंद येथील चिमुकल्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच डोंगरगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागातील बालआरोग्य, प्राथमिक आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता प्रशासन या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन डोंगरगावसह परिसरातील आरोग्य व्यवस्थेत ठोस उपाययोजना करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



