उमरखेड गटात ‘राम’ विरुद्ध ‘प्रकाश’!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
राम देवसरकर यांच्या नामांकनाने राजकीय तंबूत खळबळ; गोपाल अग्रवाल, डॉ. अंकुश देवसरकरही मैदानात
उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमरखेड तालुका गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे युवा नेते तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी आज गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी उमरखेड तालुका गटातून नामांकन दाखल करत भाजपचे उमेदवार तथा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासमोर थेट आव्हान उभे केले आहे.
राम देवसरकर यांच्या उमेदवारीमुळे उमरखेड तालुका गटातील आतापर्यंतची राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. भाजपचे उमेदवार प्रकाश पाटील देवसरकर यांनी नामांकन दाखल करताना विद्यमान आमदार किसन वानखेडे, माजी आमदार ससाने आणि भाजप नेते नितीन भुतडा यांच्यासह समर्थकांची मोठी उपस्थिती होती. या शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून विजयाचे गणित आपल्या बाजूने असल्याचा दावा केला जात होता.
मात्र, काँग्रेसचे राम देवसरकर यांनी नामांकन दाखल करून या दाव्याला थेट राजकीय उत्तर दिल्याची चर्चा आता उमरखेडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आतापर्यंत सहज विजयाची चर्चा करणाऱ्या राजकीय गोटांना आता नव्याने मतांचे गणित जुळवावे लागणार असल्याचे चित्र आहे.
गोपाल अग्रवाल, डॉ. अंकुशही मैदानात
या निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते गोपाल अग्रवाल यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचवेळी डॉ. अंकुश देवसरकर उमेदवारी दाखल करणार नाहीत, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनीही नामांकन दाखल केल्याने उमरखेड गटातील लढतीला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
त्यामुळे उमरखेड तालुका गटात आता कोणत्या उमेदवाराला कोणत्या राजकीय गटाचा पाठिंबा मिळतो आणि मतांचे विभाजन कसे होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘बदल हवा’चा सूर; ‘राम ही आयेंगे काम’च्या घोषणा
राम देवसरकर यांच्या नामांकनावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ‘बदल हवा’ तसेच ‘राम ही आयेंगे काम’ अशा घोषणांनी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे राम देवसरकर यांच्या गोटात निवडणुकीसाठी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, स्वर्गीय आमदार अनंतराव देवसरकर यांच्या जिल्हा बँकेतील पूर्वीच्या राजकीय प्रभावाचीही चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे देवसरकर कुटुंबातील राजकीय प्रभाव, स्थानिक समीकरणे आणि मतदारांचा कल यावेळी निर्णायक ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रकाश पाटलांसाठी निवडणूक ‘सोप्पी’ राहणार?
प्रकाश पाटील देवसरकर यांना जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आणि संचालकपदाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे पारंपरिक राजकीय वजन ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. मात्र, राम देवसरकर यांच्या थेट मैदानातील एन्ट्रीमुळे निवडणुकीचे गणित पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
एकीकडे भाजपकडून मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत दाखल झालेले नामांकन आणि दुसरीकडे काँग्रेसकडून राम देवसरकर यांनी उभे केलेले आव्हान, त्यात गोपाल अग्रवाल व डॉ. अंकुश देवसरकर यांची उमेदवारी—यामुळे उमरखेड तालुका गटातील निवडणूक आता बहुकोनी आणि प्रतिष्ठेची लढत बनताना दिसत आहे.
‘बदल हवा’चा सूर किती मतांमध्ये रूपांतरित होतो आणि भाजपच्या दाव्यातील राजकीय ताकद प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किती प्रभावी ठरते, याचे उत्तर निकालाच्या दिवशीच मिळणार आहे. मात्र एवढे निश्चित—उमरखेड गटाची लढत आता रंगतदार झाली असून ‘राम विरुद्ध प्रकाश’ या राजकीय संघर्षाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील अंकात सविस्तर
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



