खामलवाडी जंगलात हिंस्र वन्यप्राण्याचा गायींवर हल्ला; एक जनावर ठार, दोन जखमी वाघ की बिबट्या? संभ्रम कायम; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण — पीडित पशुपालकांना तात्काळ मदतीची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील डोंगर व जंगलाच्या सीमेलगत असलेल्या खामलवाडी तांड्याच्या जंगलात रविवारी (६ सप्टेंबर) गायींच्या कळपावर हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एका जनावराचा मृत्यू झाला असून दोन जनावरे जखमी झाली आहेत. यातील एका जनावराला वन्यप्राण्याने जंगलात ओढून नेल्याचे सांगण्यात येत असल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामलवाडी येथील गुराखी श्याम देवसिंग राठोड हे नेहमीप्रमाणे गायींचा कळप चराईसाठी जंगल परिसरात घेऊन गेले होते. लांबखोळी तलावाजवळ जनावरांना पाणी पाजत असताना अचानक कळपावर हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला केला. हल्लेखोर प्राणी वाघ होता की बिबट्या, हे गुराखीला स्पष्टपणे दिसू शकले नाही.
हल्ल्यामुळे गायी सैरभैर होऊन पळू लागल्या. गुराखीनेही आरडाओरड करत आपला जीव वाचवण्यासाठी जनावरांच्या मागे धाव घेतली. त्यानंतर शोध घेतला असता दोन जनावरे जखमी अवस्थेत आढळली, तर एका जनावराचा मृत्यू झाल्याचे समोर आले. आणखी एका जनावराला वन्यप्राणी जंगलात ओढून घेऊन गेल्याची माहिती गुराखीने दिली. गावकऱ्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र ते जनावर अद्याप आढळून आलेले नाही.
या भागात यापूर्वीही बिबट्याचा शेतकऱ्यांना शेतशिवारात अनेकदा वावर दिसून आला आहे. गतवर्षीच्या हंगामातही बिबट्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र सद्य घटनेतील हल्लेखोर वाघ होता की बिबट्या, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच खामलवाडीचे पोलीस पाटील शंकर पवार यांनी शेतकरी नेते मनीष जाधव यांना माहिती दिली. जाधव यांनी काळी दौलत खान येथील RFO राजश्री बांगर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वन विभागाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
जखमी जनावरांवर तातडीने उपचार करण्यात यावेत तसेच मृत जनावराची शासन नियमानुसार नुकसानभरपाई पीडित पशुपालक शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी मनीष जाधव यांनी केली आहे. तसेच परिसरात वावरणाऱ्या हिंस्र वन्यप्राण्याचा बंदोबस्त करून शेतकरी व पशुपालकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी विधायक मागणीही त्यांनी वन विभागाकडे केली आहे.



