नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांच्या हस्ते सूरज बोने यांचे उपोषण मागे

हिमायतनगर (प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
मौजे पारवा/मोरगाव येथील मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सूरज बबनराव बोने यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बोने यांना पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडवले.
ग्रामपंचायतीच्या कामात सरपंच, ग्रामसेवक आणि कनिष्ठ अभियंता यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाची कामे केल्याची तक्रार बोने यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन गट विकास अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी नगराध्यक्षांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत योग्य चौकशी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सूरज बोने यांनी यावेळी दिला.



