महागाव नगरपंचायत सभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर प्रभाग १ व १७ मधील देशी दारू दुकाने बंद करण्यास गती

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
आज दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी महागाव नगरपंचायत कार्यालयात झालेल्या मासिक सभेमध्ये, स्वीकृत नगरसेवक व ज्येष्ठ नेते संभाजी नरवाडे यांनी महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक १७ मधील देशी दारूचे दुकाने बंद करण्याबाबत ठराव घेऊन महागाव शहर दारूमुक्त करण्याची जोरदार मागणी केली.
या सूचनेला सभागृहातील सर्व नगरसेवकांनी एकमताने संमती देत ठराव मंजूर केला. तसेच प्रभाग क्रमांक १ व १७ मधील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनास पाठिंबा देत, त्यांच्या सहकार्याने पुढील निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबतही बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.
प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक महेश पाटील यांनी दिलेल्या निवेदनावर आपली भूमिका मांडत, महिलांच्या सहकार्याने दारूचे दुकान बंद करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या सभेतून संभाजी नरवाडे यांनी दारूबंदीच्या प्रश्नावर ठाम पुढाकार घेतलेला स्पष्टपणे दिसून आला. त्यामुळे महागाव शहरात सुरू असलेली देशी दारूची दोन दुकाने कायमस्वरूपी बंद होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, हा निर्णय दगडावरची रेघ ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महिलांनी पुढाकार घेऊन आडवी बाटली प्रक्रिया निवडणूक राबवावी असे ठरले असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये महिलांनी जिल्हाधिकारी व दारूबंदी अधिकारी यांना ताबडतोब सह्या करून निवेदन दाखल करावे अशा सूचना देण्यात आल्या तसेच
सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवत, महागाव शहरात सुरू असलेली २ देशी दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे, असे दिसून आले त्यामुळे चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाले आहे.



