शहर

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा ऐतिहासिक पुढाकार; १ ते १७ प्रभागांत ‘व्यसनमुक्ती मोहीम’! बुधवारपासून वॉर्ड क्रमांक १ पासून १७ पर्यंत फिरून मोफत औषध पाजण्याचा धडाकेबाज संकल्प


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर शहराला दारू, तंबाखू, गुटखा व सर्व प्रकारच्या व्यसनांपासून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कौतुकास्पद व ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे. या संदर्भात आज हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष शेख रफिक, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह १ ते १७ प्रभागांतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
​या बैठकीत शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १ पासून या मोहिमेची सुरुवात करून १ ते १७ वॉर्डांमध्ये फिरून व्यसनाधीन नागरिकांना मोफत व्यसनमुक्तीचे औषध पाजण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. ही मोहीम उद्या बुधवारपासून प्रत्यक्ष वॉर्ड क्रमांक १ मधून सुरू होऊन सर्व वॉर्डांत राबवली जाणार आहे.
​व्यसनाचे दुष्परिणाम व आवाहन:
दारू, तंबाखू आणि गुटख्यासारख्या जीवघेण्या व्यसनांमुळे शारीरिक आरोग्य खालावते, कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात आणि सुखी संसार उद्ध्वस्त होतात. हे रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी नगरसेवकांना आवाहन केले की, “आपल्या प्रभागात कोणता नागरिक दारू किंवा इतर नशा करतो, याची खरी माहिती स्थानिक नगरसेवकांनाच असते. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी अशा नागरिकांना शोधून आमच्यासमोर आणावे, त्यांना मोफत औषध पाजून व्यसनमुक्त केले जाईल.”
​या आयुर्वेदिक औषधामुळे नशेची सवय सुटण्यास मोठी मदत होणार आहे. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या या आवाहनाला नगराध्यक्ष शेख रफिक, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार आणि सर्व नगरसेवकांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः महिला वर्गाने आपल्या घरातील व्यसनाधीन व्यक्तींना या मोहिमेत आणून हिमायतनगरला व्यसनमुक्त बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button