Uncategorized

महागाव तालुका गटात जिल्हा बँकेसाठी तिरंगी लढतीचे संकेत २८ सोसायटी प्रतिनिधी निवडणार एक संचालक; पक्षीय समीकरणांसोबत ‘स्वतंत्र’ गटाच्या भूमिकेकडे लक्ष. (भाग ९)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे :

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महागाव तालुका गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघातील २८ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी आपल्यामधून एका संचालकाची निवड करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रतिनिधीला या निवडणुकीत निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे.
महागाव तालुक्यातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून स्व. प्रमोद राऊत यांनी यापूर्वी राजकारणात जोरदार मुसंडी मारली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत छत्री निशाणीवर त्यांनी चांगली मते मिळवत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर वसंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जिल्हा बँकेच्या महागाव तालुका गटाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी उमेदवारी दाखल केली होती.
दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीत महागाव तालुका गटातील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून प्रा. शिवाजी राठोड हे विद्यमान संचालक आहेत. ‘सिटिंग-गेटिंग’च्या तत्त्वानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला जावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र अंतिम उमेदवारी व पक्षीय समीकरणे निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्यानंतर स्पष्ट होणार आहेत.
सूचक-अनुमोदकांपासूनच आर्थिक गणिताची चर्चा
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला सूचक व अनुमोदक म्हणून दोन प्रतिनिधींची आवश्यकता असते. त्यामुळे नामांकनाच्या प्रक्रियेपासूनच प्रतिनिधींच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणता प्रतिनिधी कोणत्या उमेदवाराचा सूचक किंवा अनुमोदक राहतो, यावरून त्याची राजकीय भूमिका स्पष्ट होत असल्याने या प्रक्रियेतही आर्थिक गणित सुरू असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे.
काही सोसायटी प्रतिनिधींवर त्या संस्थेतील इतर संचालकांचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे. उमेदवाराकडून मिळणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम सोसायटीला देण्याची चर्चा असून, ज्या सोसायट्यांकडे स्वतःची इमारत अथवा बैठक व्यवस्था नाही, तेथे या माध्यमातून सुविधा उभारण्याचे प्रयत्न होतील, अशीही चर्चा आहे.
मात्र या आर्थिक व्यवहारांबाबत अधिकृत पुरावे किंवा संबंधितांची अधिकृत पुष्टी समोर आलेली नसल्याने याबाबतची सत्यता तपासणे आवश्यक आहे.
पक्षीय प्रतिनिधींसोबत स्वतंत्र विचारांच्या गटाकडे लक्ष
महागाव तालुका गटातील २८ प्रतिनिधींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला मानणारे प्रतिनिधी आहेत. मात्र याशिवाय काही प्रतिनिधी कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत न राहता स्वतंत्र विचाराने निर्णय घेणारे असल्याचे चित्र आहे.
यामध्ये पंजाबराव देशमुख, खडकेकर, संभाजीराव नरवाडे, गुलाब लोबा जाधव तसेच त्यांना मानणारे प्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक समीकरणे, व्यक्तिगत संबंध आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव यावर काही प्रतिनिधी निर्णय घेणार असल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे.
२८ प्रतिनिधी ठरवणार जिल्हा बँकेचा ‘किंगमेकर’
महागाव तालुका गटात एका संचालकाची निवड होणार असल्याने २८ सोसायटी प्रतिनिधींचा कौल अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून प्रतिनिधींच्या भेटीगाठी, संपर्क आणि राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
पक्षीय समीकरणे, विद्यमान संचालकांचे राजकीय वजन, स्वतंत्र विचारांच्या प्रतिनिधींचा गट, सूचक-अनुमोदकांची भूमिका आणि आर्थिक व्यवहाराबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे महागाव तालुका गटाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
अंतिम क्षणी कोणता गट कोणाच्या पाठीशी उभा राहतो आणि २८ प्रतिनिधींचा कौल कोणाच्या बाजूने जातो, यावर महागाव तालुका गटातील जिल्हा बँकेच्या संचालकपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. उर्वरित पुढील अंकात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button