लाच दिली नाही म्हणून सौर पंप रखडला?”

“
कुसुम योजनेतील धक्कादायक प्रकार; निंगनूरच्या महिला शेतकऱ्याची परताव्याची मागणी
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत मंजूर झालेला सौर कृषी पंप दोन वर्षांपासून बसविण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप निंगनूर येथील महिला शेतकरी सीमा रवी मुडे यांनी केला आहे. नियमानुसार 23 मार्च 2024 रोजी महाऊर्जा खात्यावर रक्कम जमा करूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी एजंटमार्फत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुडे यांनी सांगितले की, सिंचनासाठी मंजूर झालेल्या सौर पंपासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेमलेल्या एजंटमार्फत सुरुवातीला पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ती रक्कम दिल्यानंतरही आणखी पैशासाठी तगादा लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर काम मुद्दामहून रखडविण्यात येत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी त्यांनी यापूर्वी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘आपले सरकार’ पोर्टलवरून तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीचा उलट परिणाम होऊन सौर पंप बसविण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक थांबविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दोन वर्षांपासून शेतात सौर पंप बसविण्यात आलेला नसल्याने शेतीच्या सिंचनावर परिणाम होत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे मुडे यांनी नमूद केले. “जर पंप बसविणार नसाल, तर मी महाऊर्जा खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम परत द्यावी,” अशी ठाम मागणी त्यांनी महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक, यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रारीत केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे कुसुम योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
लाचखोरीमुळे योजना रखडत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे.



