शहर

महागाव नगरपंचायत : भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेली सत्ता, ‘विकास आघाडी’चा पर्याय चर्चेत


महागाव | प्रतिनिधी – संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतमधील सातत्याने उघड होत असलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण, सत्ताधाऱ्यांची अंतर्गत भांडणे आणि अपयशी कारभार यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता ढासळली आहे. परिणामी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत पक्ष चिन्ह बाजूला ठेवून ‘विकास आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे चित्र सध्या महागावमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
महागाव नगरपंचायतीत यापूर्वी काँग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षांची सत्ता राहिली. मात्र सत्तेत असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, भ्रष्टाचाराचे आरोप, आणि विकासकामांचा अभाव यामुळे नगरपंचायत कायम वादात राहिली. कचरा घोटाळा, घरकुल घोटाळा, लाईट घोटाळा, रस्ते घोटाळा अशा एकामागून एक प्रकरणे समोर येत राहिल्याने नगरपंचायतीला नियमित मुख्याधिकारीसुद्धा मिळू शकला नाही.
शिवसेना (शिंदे गट) आपली सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली. भाजपने युतीच्या जोरावर सत्ता मिळवली, मात्र तीही फार काळ टिकली नाही. त्यानंतर काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता काबीज केली. मात्र सत्तांतरानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. उलट घरकुलाच्या फाईली गायब होणे, पोलीस ठाण्यात तक्रारी, दारू दुकानांना नियमबाह्य परवानग्या, ठराव रजिस्टरवर परस्पर निर्णय अशा गंभीर बाबी सातत्याने समोर येत राहिल्या.
महागाव शहरातील नागरिकांचा आता नगरपंचायत व विद्यमान नगरसेवकांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. घनकचरा व्यवस्थापनाची वाहने निकामी अवस्थेत, डेपोकरिता जागा घेऊनही तिथे जाण्यासाठी रस्ताच नसणे, आणि रस्ता काढण्याच्या नावाखाली जागा खरेदीचे संशयास्पद ठराव — हे सर्व प्रकार नगरपंचायतीच्या अपयशाची साक्ष देत आहेत.
या पार्श्वभूमीवर महागावकरांना आता पक्षनिष्ठेऐवजी खंबीर, स्वच्छ व विकासाभिमुख नेतृत्व हवे आहे. उंबरखेड नगरपालिकेप्रमाणेच महागावमध्येही पक्ष बाजूला ठेवून विकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडावा, अशी चर्चा चौकाचौकात रंगू लागली आहे.
आठवडाभरापूर्वी शहरात काही नगरसेवकांनी जनता दरबार घेत नगरपंचायतीचे कथित कारनामे जनतेसमोर मांडले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, इतके पुरावे असतानाही कोणत्याही नगरसेवकाने सभागृहात ठोस विरोध केला नाही किंवा वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली नाही. जयश्री नरवाडे, रामराव पाटील, सुरेश नरवाडे, पांडे यांच्यासह इतर नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
बोगस घरकुल योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जनता दरबारात करण्यात आला. न्यायालयात जाण्याची भाषा झाली; मात्र आजतागायत कोणतीही ठोस तक्रार दाखल झालेली नाही. संजय नरवाडे यांनी लवकरच पुरावे सादर करून तक्रार करणार असल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही.
विशेष म्हणजे, नगरपंचायत स्थापन झाल्यापासून काही नगरसेवक सातत्याने सत्तेत असूनही प्रत्येक कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप पुढे येत आहेत. त्यामुळे “भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायत” हीच आता महागावकरांची मुख्य मागणी बनली आहे.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत मतदार यादीतील बोगस नावे वगळली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी नगरपंचायत उपाध्यक्ष उदय नरवाडे यांनी याबाबत लेखी तक्रार करून बोगस मतदार वगळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काही प्रभागांतील समीकरणे बदलणार असून, निवडणूक अधिक पारदर्शक होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, महागाव नगरपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, ‘राष्ट्रीय पक्षांचा नगराध्यक्ष नव्हे तर विकास आघाडीचा नगराध्यक्ष’ हेच भविष्यातील चित्र असेल, असा सूर आता सर्वसामान्य मतदारांमधून उमटू लागला आहे.
महागावकरांना आता केवळ एकच अपेक्षा आहे — नगरपंचायत जनतेच्या हितासाठी काम करणारी, भ्रष्टाचारमुक्त आणि जबाबदार असावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button