शहर

आदेश होऊनही शेतकऱ्याला न्याय नाही; महागाव तहसीलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सेवा नगर येथील शेतकरी अरुण भाऊराव पवार व चेतन भाऊराव पवार यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी पाईपलाईन टाकण्यासंदर्भात तहसील कार्यालयात अर्ज केला होता. शासनाच्या नियमानुसार दुसऱ्याच्या जमिनीतून पाईपलाईन टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी नायब तहसीलदार पराते यांनी दिनांक ३ जून २०२६ रोजी आदेश पारित केला होता.
या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक ५ जून २०२६ रोजी विजय मिरासिंग चव्हाण, दादूसिंग पवार व राजूसिंग राठोड यांना त्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकण्याबाबत नोटीस देण्यात आली. तसेच या नोटीसची प्रत महागाव पोलीस ठाण्यालाही पाठविण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी अरुण भाऊराव पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयात चकरा मारत असून तहसीलदार अभय मस्के यांच्याकडे वारंवार विनंती करून पटवारी, मंडळ अधिकारी व पोलीस संरक्षणाच्या उपस्थितीत पाईपलाईन टाकण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी करीत आहेत. मात्र आदेश होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस प्रशासनाकडून तहसील कार्यालयाकडून आवश्यक पत्र प्राप्त झाल्यानंतरच संरक्षण देता येणार असल्याचे सांगितले जात असताना तहसील प्रशासनाने पुढाकार घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रोज तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली असून आदेशांच्या प्रती सादर करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महागाव तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button