Uncategorized

महागावचा प्रतिनिधीच जिल्हा बँकेवर जावा; मतविभाजनाचा फायदा बाहेरील उमेदवाराला? (भाग ४)


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील २८ सहकारी संस्थांचे प्रतिनिधी अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर असून, जिल्हा बँकेवर महागाव तालुक्याचे प्रतिनिधित्व कोण करणार, याबाबत राजकीय आणि सहकारी वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
महागाव तालुक्यातील अनुभवी व स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना अनेक प्रतिनिधींकडून व्यक्त होत असताना बाहेरील व्यक्तीच्या नावाचीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींमध्ये एकमत होणार की मतविभाजनाचा फायदा अन्य उमेदवाराला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही प्रतिनिधींच्या मते, सर्व स्थानिक प्रतिनिधींनी एकत्रित भूमिका घेतली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे महागाव तालुक्याच्या हिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्राचा अनुभव, प्रशासकीय क्षमता आणि प्रभावी नेतृत्व असलेल्या व्यक्तीची निवड व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत आणि पूर्वी झालेल्या कथित अनियमिततेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचेही सहकारी वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे कामकाज अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि शिस्तबद्ध करण्यासाठी सक्षम संचालक मंडळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
काही प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, बँकेच्या कारभारावर प्रभावीपणे लक्ष ठेवणारा, आवश्यकतेनुसार प्रश्न उपस्थित करणारा आणि सभासद व शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा प्रतिनिधी जिल्हा बँकेवर पाठविणे ही काळाची गरज आहे.
महागाव तालुक्याच्या सहकार क्षेत्राची प्रतिष्ठा या निवडणुकीशी जोडली गेल्याने अंतिम निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी मिळणार की वेगळे राजकीय समीकरण आकार घेणार, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होणार आहे.
क्रमशः… पुढील भागात निवडणुकीमागील राजकीय समीकरणे, सहकार क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि प्रतिनिधींच्या भूमिकेचा सविस्तर आढावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button