अपूर्ण पुलाच्या कामामुळे हळद पिकाचे नुकसान; भरपाईची मागणी

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सेवानगर कासाळबेळ परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या कामातील त्रुटींमुळे २९, ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हळद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी धोंडोबा शामराव केला आहे. पुलाचे काम पूर्ण न करणे तसेच पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक नाल्याचा प्रवाह सुरळीत न केल्याने पावसाचे पाणी शेतात साचून मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण करण्याचे व पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने वळविण्याचे निर्देश देणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आणि हळद पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
याचबरोबर महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष नुकसान असूनही नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठवल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त करत, निवडणुकांपुरतेच मतदारसंघात फिरून नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांवर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.



