शहर

घरकुल योजनेचे हप्ते ६-७ महिन्यांपासून ठप्प; ऐन पावसाळ्यात भाड्याच्या घरात पाणी गळती, उधारीसाठी विक्रेत्यांचा तगादा अन् नागरिक त्रस्त!


​हिमायत नगर (तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम )
​हिमायत नगर: शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून म्हणजेच थेट डिसेंबरपासून रोखून धरल्याने तालुक्यातील असंख्य नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
​शासनाकडून पुढील हप्ता वेळेवर मिळेल, या एकाच आशेवर अनेक नागरिकांनी आपली हक्काची जुनी घरे पाडली आणि नव्या बांधकामाला सुरुवात केली. मात्र, ऐन मोक्याच्या वेळी निधी न मिळाल्याने या घरांची बांधकामे अर्धवट स्थितीत ठप्प झाली आहेत.
​हप्ता जमा झाल्यावर पैसे देवू, या विश्वासावर नागरिकांनी दुकानदारांकडून सिमेंट, लोखंड व इतर साहित्य उधारीवर आणले होते. मात्र ६ महिने उलटूनही निधी न आल्याने आता सिमेंट व गज विक्रेत्यांनी पैसे वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून नागरिक मानसिक व आर्थिक संकटात सापडले आहेत.
​त्यातच आता मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे भाड्याने घेतलेल्या कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. छतातून पाणी टपकण्यासोबतच जमिनीतूनही पाणी वर येत असल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. स्वतःच्या पक्क्या घराच्या आशेने जुने घर गमावलेले नागरिक आज चौफेर संकटात सापडले आहेत. वरिष्ठ प्रशासनाने व शासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन थकीत धनादेश त्वरीत जमा करावेत, अशी तीव्र मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button