शहर

माजी आमदार उत्तमराव इंगळेंना भाजपच्या कार्यक्रमांतून डावलले जातेय का?

उमरखेड-महागाव मतदारसंघात इंगळेंचा प्रभाव कायम; विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यांत अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चेला उधाण

महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे

उमरखेड-महागाव मतदारसंघाच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिलेल्या माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची भारतीय जनता पक्षाच्या अलीकडील शासकीय व पक्षीय कार्यक्रमांमधील कथित अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मतदारसंघातील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यांमध्ये इंगळे यांना अपेक्षित स्थान दिले जात नसल्याची चर्चा सुरू असून, यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

उत्तमराव इंगळे यांनी उमरखेड-महागाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर दोन वेळा आमदार म्हणून निवडून येत मतदारसंघात पक्षाचा पाया मजबूत केला होता. त्यावेळी मतदारसंघ खुला असताना त्यांनी विविध समाजघटकांशी संपर्क ठेवत राजकीय वाटचाल केली. आजही त्यांच्यासोबत आदिवासी, बंजारा तसेच इतर समाजांतील कार्यकर्त्यांचा मोठा समूह असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो.

राखीव मतदारसंघ झाल्यानंतरही प्रभाव कायम?

मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्यात उत्तमराव इंगळे यांच्या समर्थकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येतो.

राजीव नजरधने यांच्या विजयात तसेच त्यानंतर भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या ससाणे यांच्या निवडणुकीतही इंगळे समर्थकांनी पक्षासाठी मोठे काम केल्याचे सांगितले जाते. अलीकडील निवडणुकीत किसन वानखडे यांच्या विजयातही इंगळे यांचा मोठा वाटा असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

मात्र, या विजयांचे श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून भाजपमधील स्थानिक राजकारणात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे.

उमरखेड नगरपालिका निवडणुकीचे उदाहरण

उमरखेड शहरातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निधी भुतडा यांच्या विरोधात अपक्ष पॅनेल विजयी झाल्याचा संदर्भ देत, स्थानिक राजकारणात केवळ पक्षाच्या नावावर विजय मिळतोच असे नाही, याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष आहे.

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून किंवा नेत्यांकडून एखाद्या निवडणुकीच्या विजयाचे श्रेय घेतले जात असताना, दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

आदिवासी समाजात नाराजीची चर्चा

उमरखेड-महागाव मतदारसंघात मोठ्या संख्येने आदिवासी मतदार असून, उत्तमराव इंगळे यांचे या समाजातील अनेक कार्यकर्त्यांशी दीर्घकाळ संबंध असल्याचे सांगितले जाते.

भाजपच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये इंगळे यांची उपस्थिती दिसत नसल्याने त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात आहे का?, असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे आदिवासी समाजातील काही घटकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचीही चर्चा आहे.

‘मी सदैव भाजपचा कार्यकर्ता राहणार’

याबाबत माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षाशी असलेली आपली निष्ठा स्पष्ट केली.

“मी सदैव भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मतदारसंघात कार्यरत राहीन. पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि मतदारसंघात नवीन कार्यकर्त्यांची पिढी उभी करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

इंगळे हे स्वतःचा मोठेपणा सांगण्यापेक्षा आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांमार्फत तसेच विविध समाजघटकांशी संपर्क ठेवून पक्षाचे काम पुढे नेत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

‘इंगळेंशिवाय भाजपला आघाडी शक्य आहे का?’

उमरखेड-महागाव मतदारसंघात उत्तमराव इंगळे यांचा वैयक्तिक जनसंपर्क आणि समर्थकांचे जाळे आजही प्रभावी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला इंगळे यांची भूमिका दुर्लक्षित करणे राजकीयदृष्ट्या कितपत परवडेल, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

दरम्यान, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्याबाबत भाजपची अधिकृत भूमिका काय आहे आणि इंगळे यांना विकासकामांच्या कार्यक्रमांमध्ये का निमंत्रित केले जात नाही, याबाबत पक्षश्रेष्ठींकडून स्पष्टीकरण मिळाल्यास या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

उत्तमराव इंगळे यांनी मात्र पक्ष सोडण्याचा कोणताही संकेत न देता, “नवीन पिढीतील कार्यकर्ते घडवून भाजपची संघटनात्मक ताकद वाढविणे” हेच आपले पुढील उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button