रास्तभाव दुकानातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश; १.९७ लाखांच्या धान्याचा अपहार, अध्यक्षाविरुद्ध पोलिसांत तक्रार

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मलकापूर येथील संत ज्ञानेश्वर बचत गट संचलित रास्तभाव (स्वस्त धान्य) दुकानातील गंभीर गैरव्यवहार अखेर उघडकीस आला आहे. शिधापत्रिकाधारकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर अन्नपुरवठा विभागाने केलेल्या अचानक तपासणीत १ लाख ९७ हजार ८३५ रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर भोयर यांच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
शिधापत्रिकाधारकांनी लाभार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी धान्य देणे, बायोमेट्रिक पडताळणी न करता वितरण झाल्याच्या खोट्या नोंदी करणे, ई-पॉस मशीनचा गैरवापर करणे, दुकान नियमित वेळेत सुरू न ठेवणे तसेच लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न देणे अशा अनेक गंभीर तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत अन्नपुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक मोहन कोळे यांच्या नेतृत्वाखाली २० व २१ तारखेला अचानक तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान धान्य साठा, वितरण नोंदवही, ई-पॉस व्यवहार, शासकीय नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्याची पडताळणी करण्यात आली. यामध्ये नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळून आली.
तपासणी अहवालानुसार १ लाख ९७ हजार ८३५ रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अध्यक्षांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या गैरव्यवहारात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
या कारवाईमुळे महागाव तालुक्यातील इतर रास्तभाव दुकानांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्व दुकानांची विशेष तपासणी आणि आकस्मिक पाहणी करण्याची मागणी नागरिक व शिधापत्रिकाधारकांकडून जोर धरू लागली आहे. गरीब व गरजू नागरिकांपर्यंत शासनाचे अन्नधान्य पारदर्शकपणे पोहोचावे, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करून अपहार झालेल्या धान्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.



