शहर

ताजपूरा येथे २४४ किलो कथित गोमांस जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

उमरखेड | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन, फरार आरोपींचा शोध आणि गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी उमरखेड तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजपूरा येथे छापा टाकून २४४ किलो ९३ ग्रॅम कथित गोवंशीय मांस तसेच वजनकाटा, सत्तूर, लाकडी कुंदा असा एकूण ₹७५,०७९ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग व फरार आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पंचांसमक्ष ताजपूरा येथे छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान मोहम्मद नजीर अब्दुल रहेमान कुरेशी (वय ४५), रा. ताजपूरा, ता. उमरखेड यांच्या ताब्यात प्लास्टिकच्या पोत्यामध्ये कथित गोवंशीय मांस आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी एकूण २४४.९३ किलो कथित गोवंशीय मांस, वजनकाटा, सत्तूर व इतर साहित्य जप्त केले.

या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील कलम ५(क), ५(ब), ९ व ९(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोउपनि अमोल राठोड, सफौ संतोष भोरगे, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड यांनी सहभाग घेतला.

पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्रे, अवैध उत्खनन आणि इतर बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू ठेवली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टीप: जप्त केलेले साहित्य आणि कथित गुन्ह्याबाबतची माहिती ही पोलिसांनी दिलेल्या निवेदनावर आधारित आहे. संबंधित आरोपीचा दोष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button