Uncategorized

उमरखेड तालुक्यातील 5 गावांतील शाळकरी विद्यार्थिनींसाठी अतिरिक्त बसची मागणी ग्रामपंचायत अमानपूर व विद्यार्थिनींनी MSRTC आगार प्रमुख व BDO यांना दिले संयुक्त निवेदन

एस पी दळवी

उमरखेड, ता. 23 जुलै 2026: उमरखेड तालुक्यातील अमानपूर, चिल्ली, दिंडाळा, सुकळी व नागेशवाडी या गावांतील मोठ्या संख्येने विद्यार्थिनी दररोज शिक्षणासाठी उमरखेड येथे येत-जातात. मात्र या मार्गावर सध्या फक्त एकच बस उपलब्ध असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायत अमानपूरचे सरपंच बाबूलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी विद्यार्थिनींसह संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वरील पाच गावांतील विद्यार्थिनी उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळा व कन्या महाविद्यालयात शिक्षण घेतात. सकाळी 10 ते 11 व दुपारी 3 ते 5 या शाळेच्या वेळेत या एकाच बसमध्ये प्रचंड गर्दी होते. जागा न मिळाल्याने अनेक मुलींना उभ्याने किंवा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यामुळे शाळेला उशीर होण्यासोबतच अपघाताचा धोकाही वाढला आहे.

“विद्यार्थिनींचे शिक्षण आणि सुरक्षा धोक्यात”
सरपंच बाबूलाल चव्हाण यांनी सांगितले की, “दिवसेंदिवस विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे. एका बसमधून सर्वांना सामावून घेणे शक्य नाही. यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सुरक्षित आणि वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी या मार्गावर शाळेच्या वेळेनुसार किमान 2 अतिरिक्त बसेस तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे.”

आज दिलेल्या निवेदनाची प्रत मा. आगार प्रमुख, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उमरखेड आगार तसेच मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांना देण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थिनी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनासोबत शाळेचे पत्र, ग्रामसभेचा ठराव आणि गर्दीचे छायाचित्रही जोडण्यात आले आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button